रिजवीजी, बिभीषणाची भूमिका पार पाडा !

मदरशांमधून आतंकवादी निर्माण होतात, असे वक्तव्य कुणा हिंदुत्वनिष्ठाने नव्हे; तर शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी स्वतः केले आहे. मदरशांत मुसलमानेतरांनाही शिक्षण दिले जावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. या निमित्ताने अपेक्षेप्रमाणे मुसलमानांकडून रिजवी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत असली, तरी त्यापुढे जाऊन खर्‍या राष्ट्रप्रेमींनी खरोखरच मदरशांत काय शिकवले जाते, याचा ऊहापोह करणे आवश्यक आहे. अनेक आतंकवाद्यांना मदरशांतूनच प्रशिक्षण मिळाले असल्याचे आतापर्यंत उघड झाले आहे. केवळ इस्लामिक शिक्षण, मुसलमानेतरांना प्रवेश नाही, शैक्षणिक संस्थांसाठी शासनाने काढलेल्या आदेशांना जुमानणार नाही, अशी अत्यंत कडवी विचारसरणी असल्यामुळे मदरशांभोवती संशयाचे जाळे यापूर्वीच घट्ट झाले आहे. असे असूनही मदरशांना शासकीय अनुदान मिळते आणि मौलवींना शासनाकडून प्रतिमास वेतनही मिळते. सरकारी आश्रय लाभलेल्या या संस्थांमध्ये काय चालते, हेच रिजवी यांनी उघड केले आहे. गेली अनेक वर्षे राष्ट्रप्रेमी नागरिक हेच सांगत होते, तेव्हा त्यांच्याकडेच वाकड्या दृष्टीने पाहिले गेले होते. धार्मिक तेढ इत्यादी म्हणून हिंदूंना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले गेले. एरव्हीही शाळांमध्ये सरस्वतीपूजन इत्यादी करणार असल्याची चर्चाही चालू झाली, तरी शिक्षणाचे भगवेकरण इत्यादी म्हणून त्याला विरोध चालू होतो. आता येथे उघडउघड हिरवे शिक्षण दिले जात आहे. राष्ट्रविरोधी कृत्ये करण्याचे रितसर प्रशिक्षण दिले जात आहे, तर आता धर्मनिरपेक्षतावाले जिहादीप्रेमी कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत ? आता कुणीही बोलणार नाही. उलट ही बातमी दडपण्यासाठी मात्र आटोकाट प्रयत्न होतील. असो पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावाले, सर्वधर्मसमभावाच्या वल्गना करणारे यांच्याकडून याहून निराळी अपेक्षा करता येणार नाही. यानिमित्ताने प्रकाशझोतात आलेले रिजवी यांच्याविषयी बरीच उलटसुलट चर्चा होत आहे.

धर्मांधांच्या उन्मत्त कारभाराला चाप !

मुसलमान नेत्यांकडून रिजवींवर बरीच टीका होत आहे. रिजवी यांनी त्यांचा आत्मा रा.स्व. संघाला विकला आहे, असे असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे. वक्फ बोर्डातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणी होणार्‍या कारवाईपासून वाचण्यासाठी भाजप शासनाला खुश करण्यासाठी रिजवी अशी वक्तव्ये करत आहेत, असे मौलाना कलबे यांनी म्हटले आहे. रिजवी नक्की कसे आहेत, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी आतापर्यंत घेतलेले निर्णय पाहिले, तरी वक्फ बोर्डासारख्या महत्त्वाच्या इस्लामिक संस्थेची पदाधिकारी असलेली ही व्यक्ती राष्ट्रनिष्ठ आहे, हे लक्षात येते. वक्फ बोर्ड ही इस्लामच्या संपत्तीचे रक्षण करणारी मोठी संघटना आहे. बोर्डाकडे अमाप संपत्ती आहे, हेही सर्वश्रूत आहे. वक्फच्या संपत्तीतून मिळणार्‍या नफ्याचा वापर गरिबांना दान करण्यासाठी करणे आवश्यक आहे, हा इस्लामी नियम आहे. स्वतःच्या सोयीने शरीयाच्या नियमांचे शस्त्र उगारणारे मुसलमान या नियमाचे पालन करणार नाहीत, हे तर उघडच आहे. उलट वक्फ बोर्डाची भूमी परस्पर विकून व्यक्तीगत लाभ करून घेणार्‍यांपैकी मौलाना कलबे जावेद आहेत. वक्फ बोर्डाची भूमी परस्पर विकून त्यातून आलेल्या पैशांतून कलबे यांनी व्यक्तीगत संपत्ती मिळवली आहे. आता मौलाना कलबे यांच्या विरोधात पोलीस तक्रार होणार असल्यामुळे ते रिजवी यांना कडवा विरोध करत आहेत. मतपेटीचे राजकारण आणि मुसलमानांमध्ये असलेली आक्रमक वृत्ती यांमुळे सरकार कधी मुसलमान संस्थांच्या व्यवहारांमध्ये लक्ष घालत नाही. एरव्ही कुणाला देशातील सर्वच संस्थांचे नियमन चांगले व्हावे, याची फार मोठी चिंता आहे, असे नाही. त्यामुळेच हम करे सो कायदा अशी धर्मांधांची वृत्ती झाली आहे. त्यामुळे रिजवी यांच्यासारख्या अध्यक्षाची मुसलमानांना आता अडचण वाटू लागली आहे.

रिजवी यांनी राष्ट्रकल्याणासाठी कार्य करावे !

रिजवी यांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत आहे, हे याप्रमाणेच त्यांच्या इतरही वक्तव्यांवरून लक्षात येते. २-३ अपवाद वगळता अन्य मोगल अय्याशी असल्यामुळे इतर मुसलमानांनी त्यांचा आदर्श ठेवू नये, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यापूर्वी त्यांनी अयोध्येत राममंदिर व्हावे आणि मशीद अन्यत्र स्थलांतरित करावी, अशी रास्त भूमिका मांडली होती. श्री श्री रविशंकरजी यांनी राममंदिर निर्माणाच्या कार्यात मध्यस्ती करावी, यासाठी रिजवी यांनी त्यांची भेटही घेतली होती. इस्लामच्या स्थापनेपासून गेली १४०० हून अधिक वर्षे आक्रमक मुसलमानांनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. हिंदूंची प्राचीन मंदिरे पाडून त्या ठिकाणी मशिदी उभारल्या, माता-भगिनींवर अत्याचार केले, भूमी गिळंकृत केल्या. आता रिजवी मुसलमानांची तशीच प्रकरणे उजेडात आणत आहेत. स्वकियांच्या विरोधातील कटू सत्य मांडणारे रिजवी खरे हिंदुस्थानी राष्ट्रनिष्ठ आहेत. रिजवी जर सत्यच सूत्रे सांगत आहेत, तर त्यांना धर्मांधांकडून विरोध का होत आहे ? विरोध होतो; कारण धर्माने मुसलमान असले, तरी कर्माने ते सन्मार्गी आहेत. त्यांचे हे प्रयत्न गेली अनेक वर्षे इस्लामी आक्रमणामुळे व्यथित झालेल्या हिंदूंच्या जखमा भरून काढणारे आहेत. रिजवी यांना कितीही विरोध झाला, तरी त्यांनी त्यांचे राष्ट्रकल्याणकारी दायित्व अशाच प्रकारे निभावून बिभीषणाची भूमिका पार पाडावी. बिभीषण रावणाचा भाऊ असला, तरी प्रभु श्रीरामाच्या कृपाछत्राखाली आल्यामुळे त्याचे कल्याण झाले. त्याचप्रमाणे रिजवी यांनीही राष्ट्रकल्याणाच्या पक्षात येऊन धर्मांधांच्या राष्ट्रविरोधी मोहिमा हाणून पाडण्यासाठी सरकारला साहाय्य करावे.