हिंदु समाज कौरवबुद्धीने नष्ट करण्याचा प्रयत्न !

खोटे आरोप करणार्‍यांना पू. संभाजी भिडेगुरुजी यांचे प्रत्युत्तर

पू. संभाजी भिडेगुरुजी

सांगली – कोरेगाव भीमा येथे मी गेल्या अडीच-तीन वर्षांत फिरकलेलोही नाही आणि माझ्यावर दंगल घडवण्याचे आरोप करण्यात येत आहेत. ज्यांच्या मुलाखतीमुळे दंगल झाली, ज्यांनी माझ्या सहभागाची माहिती दिली, त्या सर्वांची चौकशी होणे आवश्यक आहे. या हिंदु समाजाची तोडफोड करून, हिंदु समाज नष्ट करावा, यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. हातातून सत्ता गेलेल्यांची यामागे कौरवबुद्धी आहे, असा घणाघात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी येथे वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींपुढे बोलतांना केला. या वेळी पू. गुरुजींनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या सर्व आरोपांचा चांगलाच समाचार घेऊन सर्व आरोपांना सडेतोड उत्तरे दिली.

पू. भिडेगुरुजी पुढे म्हणाले की,

१. लहान लेकराला कोणती वस्तू हातात मिळाली की, तो तोंडात घालतो, त्याचा कसा वापर करायचे हे त्याला माहिती नसते. तसाच भाग सध्या आहे. लोकशाहीच्या काळात राजकारण्यांच्या हातात मिळालेल्या गोष्टींचा त्यांनी दुरुपयोग केला आहे. लोकशाहीचा त्यांनी चोथा करून टाकला आहे.

२. गेल्या अडीच-तीन वर्षांत मी त्या भागात फिरकलोसुद्धा नाही. तेथे असणारी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी ही आमचे श्रद्धास्थान आणि निष्ठास्थान आहे.

३. एका महिलेने माझ्या विरोधात दिलेल्या पोलीस तक्रारीमध्ये ‘प्रत्यक्ष धोंडा मारतांना मी भिडेगुरुजींना पाहिले आहे’, असे नमूद केले आहेे. ही तक्रार दुर्दैवी आहे. मी तिथे नव्हतोच. ज्या ठिकाणी हिंसाचार झाला, तेथील कॅमेर्‍यातील फूटेज पहावे.

४. माझ्या भाषणामुळे दंगल उसळली, असे म्हणणे म्हणजे ‘न जन्मलेल्या मुलाच्या बारशाची सिद्धता करणे’ होय.

५. ‘माझ्यामुळे ही दंगल घडली’, असा आरोप करणे म्हणजे एखाद्या खगोलशास्त्रज्ञाने ‘मी अमावास्येच्या रात्री १२ वाजता पूर्वेला सूर्य पाहिलाय’, असे म्हणण्यासारखे आहे.

६. अ‍ॅट्रॉसिटीचा देशात पुष्कळ वाईट वापर केला जात आहे. लोकशाहीचा मुडदा पाडण्याचे सामर्थ्य एका गटाला देऊन मोठी चूक केली आहे.

७. प्रकाश आंबेडकर यांना आमची नावे कोणी दिली, कोण वार्ताहर होते, या सगळ्या गोष्टींचा मुळाशी जाऊन तपास झाला पाहिजे.

८. व्हॉट्सअ‍ॅपवर एक संदेश (मॅसेज) जात होता. ‘पू. भिडेगुरुजींचे भाषण या दिनांकाला आहे, त्या भाषणामुळे सर्व झाले’, असे त्यात लिहिले होते. सायबर क्राईमने मुळाशी जाऊन हे शोधले पाहिजे की, हा संदेश व्हॉट्सअ‍ॅप वर कुणी टाकला आहे.

९. विवेक मोठ्यांमध्ये नाही, तर छोट्यांमध्ये कसा असणार ? ज्यांना खेटरापाशी उभे करू नये, असे हे राजकारणी आहेत. सर्व समाजाला कलंक असा हा प्रकार झाला आहे. या प्रकरणी ज्यांचे हात आहेत, त्यांना देहांत शासन करावे.

१०. भगवान श्रीकृष्णावरही स्यमंतक मणी चोरल्याचा आरोप करण्यात आला होता. इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे, त्यामुळे भिडे, एकबोटे, घुगे यांची नावे घेतली गेली आहेत.

११. माझ्या पाठीशी भगवंत आहे, ही विलक्षण श्रद्धा आहे. आसेतू हिमाचल हिंदु समाज उत्पन्न व्हावा, यासाठी श्री शिवप्रतिष्ठान कार्यरत आहे.

१२. माझ्यावरील सर्व आरोप निराधार असून मी न्यायालयीन, केंद्रीय अन्वेषण यंत्रणा, तसेच अन्य कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमाकडून होणार्‍या चौकशीला सामोरे जाण्यासाठी सिद्ध आहे.

१३. शेतकर्‍यांचे आंदोलन, मराठा आरक्षण, लिंगायत समाजाचा वेगळा धर्म आदी मागण्यांच्या मागे मोठे राजकारण आहे. ही सत्तेची भूक आहे, जी लोकशाहीला न मानणारी आहे. सर्वपक्षीय नेतेमंडळी यामध्ये सहभागी आहेत.

१४. तरी ज्याप्रमाणे अंतिम विजय पांडवांचा झाला, तसेच होणार आहे.

पू. भिडेगुरुजी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,

१. पुण्यश्‍लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या बीजमंत्रांच्या आधारावर आसेतू हिमाचल सारा हिंदुसमाज एकरूप, एकमय, एकचित्त करून प्रत्येक हिंदूने परमपवित्र भारतमातेचे ऋण फेडण्याचे कर्तव्य बजावावे, अशी राष्ट्रजागृती करून एकहृदय हिंदुसमाज करण्याचे पवित्र कार्य करणारे आम्ही लोक आहोत.

२. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेप्रमाणे गावोगावी त्यांच्या अनुयायांनी नागरिकांची वाहने, घरे, दुकाने आणि सार्वजनिक मालमत्ता यांचा विध्वंस केला. ‘या गोष्टींना कारणीभूत असणार्‍या व्यक्तींमध्ये मी कारणीभूत आहे. या प्रकरणी माझ्यावर अटकेची कारवाई करून मला याकूब मेमनची वाट दाखवावी’, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. वस्तूत: हा सर्व बनाव असल्याने याची सखोल चौकशी शासनाने करावी.

भिडे गुरुजींच्या विरोधात बोलण्याची कुणाची लायकी नाही ! – छत्रपती उदयनराजे भोसले

नवी दिल्ली – पू. भिडेगुरुजी माझ्यासाठी नेहमीच आदर्श होते अणि भविष्यातही रहातील. त्यांचे ज्ञान आणि युवकांना संघटित करण्याचे कार्य उत्तुंग आहे. त्यांचा कोरेगाव भीमा प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. गुरुजींच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा नोंदवण्यापूर्वी थोडा तरी विचार करायला हवा होता. जे लोक त्यांच्या विरोधात बोलत आहेत त्यांची  गुरुजींविषयी बोलण्याची लायकीही नाही, अशी प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी वृत्तवाहिनीशी बोलतांना व्यक्त केली. पू. भिडेगुरुजींवर नाहक आरोप केले जात असून गुरुजींना भविष्यातही पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘भीमा कोरेगावला झालेल्या वादाविषयी अतिशय दु:ख वाटते. वैयक्तिक स्वार्थासाठी समाजात उद्रेक होईल, असे बोलणे चुकीचे आहे. असे प्रकार चालू राहिले तर महाराष्ट्राचेच नाही; तर देशाचे तुकडे होतांना पहावे लागेल. मी ते सहन करणार नाही. शिवछत्रपतींनी कधी जातपात बघितली नाही. ते सर्व समाजाचे आदर्श आहेत.’’

 


Multi Language |Offline reading | PDF