पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांची कोणतीही शहानिशा न करता गुन्हे प्रविष्ट करणार्‍यांची उच्चस्तरीय चौकशी करा !

सांगली येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची भव्य मोर्च्याद्वारे मागणी

सांगली, ४ जानेवारी (वार्ता.) – कोरेगाव भीमा प्रकरणात पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांचा कोणताही संबंध नसतांना त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला. कोणतीही शहानिशा न करता पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करणार्‍यांची उच्चस्तरीय चौकशी करावी. हा गुन्हा त्वरित काढून घ्यावा, या तसेच अन्य मागण्यांसाठी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय येथे भव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. शिवतीर्थापासून या मोर्च्याला प्रारंभ झाला. शहरातील विविध मार्गांवरून जाऊन दोन्ही ठिकाणी निवेदन देण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने धारकरी सहभागी झाले होते.

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह श्री. नितीन चौगुले यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

१. प्रकाश आंबेडकर हे कोणताही पुरावा नसतांना खालच्या पातळीवर जाऊन गुरुजींवर आरोप करत आहेत. यामागे त्यांचा हेतू शुद्ध नाही. कोणत्या संघटना हे करण्यास त्यांना भाग पाडत आहेत, याची चौकशी व्हावी.

२. कुणीतरी जाणीवपूर्वक ही जातीय तेढ निर्माण करून त्यांची पोळी भाजून घेत असून महाराष्ट्रातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

३. ३ जानेवारीला ‘बंद’च्या काळात सांगलीत काही हुल्लडबाजांनी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या आगामी गडकोट मोहिमेच्या फलकाला लक्ष्य करून गुरुजींच्या चित्राची विटंबना केली. सांगलीतील अनेक निरपराध नागरिक, व्यापारी, हातगाडीवाले यांना लक्ष्य केले. अशा हुल्लडबाजांवर तात्काळ कारवाई करावी. या सर्वांमागील सूत्रधाराचा छडा लावून सामाजिक वातावरण निकोप रहाण्यासाठी साहाय्य करावे.


Multi Language |Offline reading | PDF