भीमा-कोरेगाव लढाई : पेशव्यांच्या गनिमी कावा लढाईतील एक सोनेरी पान

शनिवारवाड्यावर होणार्‍या ब्राह्मणद्वेषी एल्गार परिषदेच्या निमित्ताने…

वर्ष १८१८ मध्ये झालेल्या भीमा कोरेगांव लढ्याविषयी सध्या बरेच अपसमज पसरवले गेले आहेत. त्या वेळी इंग्रजांनी मराठ्यांचा पाडाव केला, असा खोटा इतिहास सांगितला जात आहे. वास्तविक पहाता, तत्कालीन पुरावे अभ्यासल्यास या युद्धात मराठी सैनिकांनी इंग्रजी फौजांची पळता भुई थोडी केली. कोरेगावची लढाई ही मराठी माणसाला अभिमान वाटावा, अशी आहे; मात्र भीमा-कोरेगाव येथे झालेल्या लढाईत इंग्रजांच्या नेतृत्वाखाली महार समाजाने पेशवाईचा पराभव केल्याच्या इतिहासाची मांडणी केली जाते. या कथित विजयाच्या प्रीत्यर्थ भीमा-कोरेगाव येथे उभारण्यात आलेल्या स्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्यभरातील अनेक मागासवर्गीय त्या ठिकाणी येतात. या घटनेला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जातीद्वेषाच्या उमाळ्यातून शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबरला दुपारी २ वाजता एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या लढाईविषयी लोकांचा अपसमज दूर व्हावा, यासाठी लढाईची वास्तवदर्शी माहिती या लेखाद्वारे वाचकांना देत आहोत. हा लेख लिहिण्याचे कारण कोणावरही जातीय दृष्टीकोनातून टीका करणे नसून आपण आपल्याच इतिहासाची लावलेली विल्हेवाट थांबावी, असा आहे.

लेखक : श्री. कौस्तुभ कस्तुरे, इतिहासाचे अभ्यासक

१. हिंदूंमधील जातीपातीचा सत्तास्थापनेसाठी उपयोग करणारे धूर्त इंग्रज

१ जानेवारी १८१८ या दिवशी पुण्याजवळ कोरेगाव येथे झालेल्या तिसर्‍या इंग्रज-मराठा युद्धातील एका चकमकीत इंग्रजांचा पूर्ण पराभव झाला खरा; पण इंग्रजांनी झाकली मूठ सव्वा लाखाची या उक्तीनुसार जगासमोर आम्ही जिंकलो अशी हूल उठवली आणि त्यातही येथील जाती-पातींमध्ये भांडणे लावून द्यायला महार रेजिमेंट विरुद्ध पेशवा अशी किनार या वादाला मुद्दाम जोडून दिली.

२. शत्रूला धक्कातंत्राद्वारे चकीत करणारे पेशवे

येरवड्याच्या लढाईनंतर दुसरे बाजीराव एकदम दक्षिणेकडे वळले आणि त्यांनी जाणीवपूर्वक वर्तुळाकार पलायन चालू केले. त्यामुळे इंग्रजांना बाजीराव पळत आहेत, असे स्वाभाविकपणे वाटले. येरवड्यानंतर मराठी फौजा या पुरंदर-माहुली करत पुसेसावळीला येऊन पोहोचल्या. माहुलीला पेशव्यांना सरलष्कर अप्पा देसाई निपाणकर येऊन मिळाले. पुसेसावळीहून मिरजमार्गे दक्षिणेकडे न जाता बाजीराव थेट पूर्वेकडे पंढरपूरच्या रोखाने वळले. इंग्रजांच्या फौजांना बाजीराव अजूनही दक्षिणेच्या रोखाने जात आहेत, असे वाटत होते. जेव्हा इंग्रजी फौजा पुसेसावळीत आल्या, तेव्हा त्यांना बाजीरावाचा हा गनिमीकावा लक्षात आला. तेव्हा बराच विलंब झाला होता. आपल्याला चकवले गेले, हे त्यांच्या लक्षात आले.

३. मराठ्यांच्या गनिमीकावा या युद्धतंत्राची चुणूक

पुढे या इंग्रजी फौजा पंढरपूरच्या रोखाने येत असतांना सेनापती बापू गोखल्यांच्या सैन्याने त्यांना सळो कि पळो करून सोडले. बाजीरावसाहेब पुढे येथून नगर जिल्ह्यातील पीरगाव आणि तेथून नाशिकच्या दिशेने वळले. बाजीराव पेशव्यांनी या हालचाली इतक्या जलदगतीने केल्या की, इंग्रजी फौजांना आता बाजीरावांचा पाठलाग करणे अशक्य झाले. मराठ्यांचा गनिमी कावा काय असतो, याची ब्रिगेडिअर जनरल स्मिथला निश्‍चिती पटली होती. तो सर्वत्र मोठा तोफखाना समवेत नेण्यामुळे कंटाळला होता. नाशिककडे जाण्याचा विचार सोडून तो शिरूरला पोहोचला. तेथे त्याने त्याचा तोफखाना मागे ठेवला आणि सड्या फौजेनिशी संगमनेरला येऊन पोहोचला. आतापर्यंत स्मिथची अशी समजूत होती की, बाजीराव नाशिकला गेले आहेत; पण संगमनेरवरून बाजीराव त्रिंबकजी डेंगळ्यांच्या समवेत थेट डावीकडे वळून ब्राह्मणवाड्याचा घाट उतरून पुण्याकडे वळले, हे समजल्यावर स्मिथ अगदी मेटाकुटीला आला. बाजीराव स्मिथला झुकांड्या देत ३० डिसेंबर १८१७ या दिवशी पुण्याजवळ चाकण येथे जाऊन पोहोचले. येथून पुणे आता अगदी जवळ, म्हणजे जेमतेम आठ कोस (साधारणतः २५ किमी) अंतरावर होते.

१८ नोव्हेंबरला पुणे सोडल्यापासून सुमारे दीड मासाच्या अवधीत पुरंदर, सालप्याचा घाट, माहुली, पुसेसावळी, मिरज, पंढरपूर, पीरगाव, संगमनेर, ओझर, जुन्नर, खेड आणि चाकण करत बाजीराव पुन्हा पुण्याजवळच आले आणि आपल्याला गोल फिरवून दमवण्याचा बाजीरावांचा गनिमी कावा इंग्रजांच्या लक्षात आला.

४. दीड मासांत पेशवे हाती न लागणे, ही इंग्रजांवर ओढवलेली नामुष्की

गेल्या दीड मासांत दहा-बारा ठिकाणच्या मुक्कामात आणि सुमारे दोनशे कोसांच्या प्रवासात स्मिथला बाजीरावांचे नखही दिसले नाही. ही तर इंग्रजांसाठी नामुष्कीची गोष्ट होतीच. त्याहूनही नामुष्की अशी की, ज्या पेशव्यांना पुण्यातून पळवून लावले, असा डंका इंग्रज पिटत होते, ते पेशवे इंग्रजांनाच मूर्खात काढून अगदी सहज दीड मासांत पुन्हा फिरून पुण्याच्या वेशीवर येऊन पोहोचले होते; म्हणजे गोर्‍यांचा सारा खटाटोप फुकट गेला होता. दीड मास इंग्रजी सैन्य बाजीराव हाती लागतील, या आशेने उगाच रानोमाळ फिरत राहिले.

५. नाविन्यपूर्ण चाल रचून मराठ्यांचा इंग्रजांना चकवा

बाजीरावांनी या सगळ्या खेळात एक अशी चाल खेळली होती की, सैन्याच्या मागे लहान तुकड्या इंग्रजांच्या नजरेस पडतील, अशा पद्धतीने मुद्दाम रेंगाळत रहात. बाजीराव गेले त्याच्या नेमक्या उलट्या दिशेने हळूहळू सरकत. साहजिकच, बाजीरावही याच वाटेने पुढे गेले आहेत, असे इंग्रजांना वाटे. दुसर्‍या वाटेने बाजीराव बरेच पुढे गेले, याची निश्‍चिती पटताच मागे रेंगाळणार्‍या पेशव्यांच्या तुकड्या जंगलातून काढता पाय घेत. मग मात्र इंग्रज सेनाधिकारी विचार करण्याव्यतिरिक्त काही करू शकत नसत.

६. कॅप्टन स्टाँटनला कोंडीत पकडले

बाजीराव चाकणला पोहोचले, तेव्हा कर्नल बर या नावाचा अधिकारी पुण्याच्या इंग्रजी तुकडीचा प्रमुख होता. त्याने स्मिथचा पत्ता नाही आणि बाजीराव तर आता केव्हाही पुण्यावर आक्रमण करू शकतात, हे पहाताच काहीतरी साहाय्य मिळावे, असे म्हणून शिरूरला कॅप्टन स्टाँटनकडे साहाय्य मागितले. शिरूरच्या ५०० बंदुका, २ तोफांसह २५ गोरे गोलंदाज आणि ३०० मराठी लोक असणार्‍या या पलटणीला सेकंड ग्रेनेडिअर अथवा सेकंड बटालिअन असे म्हणत. बरचा निरोप आल्यावर स्टाँटन ३१ डिसेंबरच्या रात्री ८ वाजता शिरूरहून निघाला आणि १ जानेवारी १८१८ या दिवशी सकाळी १० वाजता कोरेगाव जवळच्या एका टेकडीवर जाऊन पोहोचला. अर्थात आपण आता पुणे घेतले, तर पुन्हा अडकू हे ठाऊक असल्याने बाजीरावांनी पुण्याला वळसा घालून स्टाँटनला मराठी हिसका दाखवत पुन्हा दक्षिणेकडे जाण्याचे ठरवले. स्टाँटनला याची काहीच माहिती नव्हती. १ जानेवारीला सकाळी त्याने टेकडीवरून खाली उतरून पाहिले, तर भीमा नदीच्या खोर्‍यात त्याला पेशव्यांची प्रचंड फौज दिसली. एवढ्या मोठ्या सैन्यापासून आता आपले रक्षण होणार नाही, हे पहाताच स्टाँटन त्याची पलटण घेऊन जवळच असणार्‍या कोरेगावात शिरला. इंग्रज गावात शिरत आहे, हे पहाताच त्यांना मारण्यासाठी आणि मुख्यतः त्यांची गळचेपी करण्यासाठी मराठी फौजेच्या एका तुकडीनेही इंग्रजांवर चाल केली. कोरेगावला चारही बाजूंना तटबंदी होती. येथे अधिक वेळ काढणे उपयोगी नाही; म्हणून केवळ ३ सहस्र सैनिकांची एक तुकडी मागे ठेवून पेशवे सोलापूरच्या रोखाने निघून गेले.

७. मराठ्यांनी केलेला इंग्रजांचा पाडाव !

इंग्रज रात्रभर झालेल्या प्रवासाने दमले होते. अशातच सकाळी युद्धाचा प्रसंग उभा ठाकला. इंग्रजी तोफा आधी भीमेच्या रोखाने वाळवंटात उभ्या होत्या. मराठे दुसर्‍याच बाजूने आक्रमण करू लागले, हे पहाताच इंग्रजांनी नाईलाजाने त्या तोफा तटबंदीच्या आत घेतल्या आणि मार्‍याच्या ठिकाणी बसवल्या. मराठ्यांनी इंग्रजांचा पाणीपुरवठा तोडला होते. भीमेवर मराठी चौक्या असल्याने इंग्रजी सैन्याला पाण्याची वानवा होती. अशातच पेशव्यांच्या फौजेतील अरबांनी इंग्रजांवर चाल केली आणि त्यांची एक तोफ बंद पाडली. या तोफेवरील इंग्रज अधिकारी लेफ्टनंट चिशोम याला ठार मारण्यात आले आणि विजयाप्रीत्यर्थ त्याचे मस्तक पेशव्यांकडे पाठवण्यात आले. इंग्रजांकडील लेफ्टनंट स्वाँस्टन, लेफ्टनंट कोनलन आणि असिस्टंट सार्जंट विंगेट गंभीर घायाळ झाले. विंगेटला गावातील एका धर्मशाळेत हालवण्यात आले असता अचानक मराठी फौजांनी ती धर्मशाळा कह्यात घेतली आणि विंगेटलाही ठार केले. एवढ्यात इतर काही इंग्रज अधिकारी तेथे आल्याने बाकीचे दोघे अधिकारी वाचले आणि मराठ्यांनी तेथून काढता पाय घेतला. याशिवाय गावात एक मोठी मजबूत गढी होती. इंग्रजांची दृष्टी तिच्यावर पडण्याआधीच मराठी फौजांनी ती गढी कह्यात घेतली. आता येथून इंग्रजी फौजांना मारणे चांगलेच शक्य होते. मराठे मोक्याच्या जागी पोहोचले, हे पाहताच इंग्रजांची पाचावर धारण बसली.

८. इंग्रज सैनाधिकार्‍यांना एकटे पाडून त्यांचा फडशा पाडणे

रात्र झाली आणि दिवसभरात पेशवे लांबच्या मजला मारत पुष्कळ पुढे निघून गेले, हे पहाताच मराठी फौजांनी आपले काम झाले, असे समजून हळूच काढता पाय घेण्याचे ठरवले. पुन्हा स्मिथच्या फौजा कोरेगावनजिक आल्या तर आपण आतच अडकले जाण्याची शक्यता होती. एरव्हीही इंग्रज मोडलेच ंहोते. त्यामुळे येथून गेलेले बरे, असा विचार करून मराठी फौजा रात्री नऊच्या सुमारास गावातून बाहेर पडल्या. त्या भीमा ओलांडून गेल्याची खात्री पटताच इंग्रजी पलटण पाण्यासाठी भीमेकडे चक्क धावत सुटली. दिवसभर मराठ्यांनी इंग्रजांचे पाणी तोडले होते. अशा रितीने कॅप्टन स्टाँटनचा पूर्ण पराभव करून मराठी फौजा लोणी मुक्कामी आल्या. स्टाँटनची मराठ्यांनी अशी गत केली, हे स्मिथ आणि बर यांना ठाऊक नव्हते. संगमनेरहून निघाल्यानंतर ओझरच्या घाटात त्रिंबकजी डेंगळ्यांच्या माणसांनी स्मिथची अक्षरशः लांडगेतोड करवली होती आणि तो कसाबसा २ जानेवारी या दिवशी चाकणला येऊन पोहोचला. स्टाँटनचाही पूर्ण पराभव झाल्याने पुण्याला बरच्या साहाय्याला जाणे शक्यच नव्हते; म्हणून तो २ जानेवारीच्या रात्री पुन्हा शिरूरला निघाला. या लढाईत इंग्रजांकडील तीनशे, तर मराठी फौजेतील सुमारे पाचशे लोक पडले; पण यातही इंग्रजांचे २ नामांकित सरदार मारले गेले. समकालीन इंग्रज अधिकारी आणि पुढे सातार्‍याचा रेसिडेंट ग्रँट डफ इंग्रजांच्या झालेल्या हानीविषयी म्हणतो, त्या लढाईत इंग्रजांचे मृत आणि जखमी मिळून १५६ शिपाई अन् वीस गोरे गोलंदाज पडले. इतके होऊन उरातून दोन गोळ्या पार झालेला पॅटीसनसाहेब त्याच्या तळावर पोहोचल्यानंतर मेला. त्याव्यतिरिक्त दुसरे दोघे साहेब त्या लढाईत मृत्यू पावले आणि दोन जखमी झाले. एकूणच, इंग्रजांचे सुमारे २५०-२७५ च्या आसपास लोक मृत्यू पावले. ५०० मराठे वीरगतीला प्राप्त झाले.

९. इंग्रजांनी स्वत:च्या खोट्या विजयाची तुतारी फुंकणे

इंग्रजांनी मात्र या वेळी पेशवा घाबरून पळाला, अशी फुशारकी मारली; पण मुळात पेशव्यांचा दक्षिणेचा मार्ग मोकळा होण्यासाठी इंग्रजांना कोरेगावात डांबून ठेवण्यासाठी ही युक्ती केली होती, हे काही त्या बिचार्‍यांना समजले नाही. कोरेगावात मराठी फौजांचा निःसंशय विजय झाला; पण नंतरच्या काळात योगायोगाने पेशव्यांचा पाडाव झाला. त्यानंतर इंग्रजांनी खुशाल आमचाच जय झाला, अशी थाप ठोकून दिली. वर्ष १८२२ मध्ये मराठी राज्य बुडाल्यानंतर इंग्रजांनी भीमेच्या काठावर चक्क विजयस्तंभ उभारला अन् त्यावर लिहिले, One of the proudest triumphs of the british army in the east ! म्हणजे खोटे बोल पण रेटून बोल, हे त्यांनी सार्थ ठरवले. इंग्रजांच्या या ढोंगीपणाचे शिवरामपंत परांजपे यांनी मराठ्यांच्या लढायांचा इतिहास मध्ये चपखल शब्दांत वर्णन केले आहे – ब्रिटीश सैन्य इतक्या धडधडीत रितीने येथे नामोहरम झाले असतांनाही अतिशय गर्व वहाण्यासारखा हा विजय होता, असे म्हणून इंग्रजांकडून जयस्तंभ उभारले जातात, यावरून पूर्वीचे खोटे इतिहास कसे बनवण्यात आले आहेत, त्याच्याविषयीची कल्पना कोणालाही करता येण्यासारखी आहे !

समकालीन मराठी साधने जे सांगतात, त्याच्या नेमके उलटे चित्र इंग्रजांनी चार वर्षांनंतर म्हणजे वर्ष १८२२, शके १७४३ मध्ये जेव्हा त्यांना अडवायला येथे कोणीही नव्हते, तेव्हा उभारले आहे. येथे साधा प्रश्‍न पडतो की, स्टाँटनचा जर इंग्रजांच्या म्हणण्याप्रमाणे विजय झाला असता, तर तो हात हलवत शिरूरला का परतला ? तो ना बरच्या साहाय्याला गेला, ना पेशव्यांच्या पाठलागावर गेला.

१०. जात्यंधतेचे विष पेरणारे कावेबाज इंग्रज

येथे राहून पुन्हा उठाव होऊ नयेत, तसेच येथील माणसांच्या मनात ब्राह्मण-अब्राह्मण हा संघर्ष पेटवून इंग्रजांनी ब्राह्मणेतर समाजाच्या मनात पेशव्यांविषयी विष पेरले आणि त्याकरता मुद्दाम पेशवाईत ब्राह्मणेतरांवर किती अन्याय झाला, अशा अर्थाने कथा पसरवल्या. इंग्रजी आमदनीत ब्राह्मणांकडून काही ठिकाणी अत्याचार झाले, हे उघड आणि सर्वज्ञात आहेच, किंबहुना म्हणूनच डॉ. आंबेडकर, आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा समाजसुधारकांना वर्णवर्चस्वतेविरुद्ध झगडावे लागले; पण म्हणून हे सारे पेशवाईपासून चालू आहे, हा समज पूर्ण निराधार आहे.

(संदर्भ : www.kaustubhkasture.in)


Multi Language |Offline reading | PDF