कला अकादमीच्या नूतनीकरणात १८ त्रुटी असल्याचा आय.आय.टी. मद्रासचा अहवाल

१ ऑगस्टपासून पुन्हा दुरुस्तीचे काम चालू होणार

पणजी, ९ जून (वार्ता.) – पणजी येथील कला अकादमीच्या नूतनीकरणात १८ गंभीर त्रुटी असल्याचे मद्रास आय.आय.टी.ने दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी कला अकादमी पुन्हा १ ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कला अकादमीचे नूतनीकरण झाल्यानंतर गेल्या वर्षी कला अकादमीत कार्यक्रम चालू करण्यात आले होते; परंतु नूतनीकरण केल्यानंतर ते काम दर्जाहीन झाल्याचा आरोप होत होता. गोव्याच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक मानल्या जाणार्‍या कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतरही छताला गळती, रंगकाम, संरचनात्मक दुर्बलता आणि अन्य तांत्रिक समस्या कायम असल्याची तक्रार कलाकार अन् नागरिक यांनी केली होती. त्यामुळे मद्रास येथील आय.आय.टी ला कला अकादमीच्या नूतनीकरणातील त्रुटींविषयी अहवाल देण्यास सांगण्यात आले होते.

कला अकादमीच्या विशेष कृती दलाचे (टास्क फोर्सचे)  अध्यक्ष दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली ९ जून या दिवशी महत्त्वाची बैठक होऊन या अहवालावर चर्चा करण्यात आली. या चर्चेतून कला अकादमीच्या नूतनीकरणामध्ये १८ गंभीर तांत्रिक दोष असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. विशेष कृती दलाने  संबंधित कंत्राटदाराकडून खर्चाची वसुली करण्याची मागणी केली आहे. प्रकल्पासाठी केलेला अनुमाने ८० टक्के खर्च वाया गेल्याचे विशेष कृती दलाने नमूद केले होते.

संपादकीय भूमिका

सर्व संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडून अतिरिक्त खर्च वसूल करा !