खराडी (पुणे) येथे दिवाळखोर माहिती तंत्रज्ञान आस्थापनात नोकरी देऊन अनेकांची फसवणूक !

पुणे – खराडी येथील दिवाळखोर आस्थापनात नोकरीचे आमीष दाखवून अनेकांची ४४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी ‘रेडीयंट एडटेक एल्.एल्. पी.’चे मालक सैफ वाहिद मनियार, व्यवस्थापक सुमित सुराना, आर्थिक व्यवस्थापक वैभव दुबेवार, इतर संचालक, तसेच ‘जी.टी. ॲस्ट्रेक्स’ आस्थापनाचे गितेश कुंबलकर आणि संचालक मंडळ यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी शिरूर तालुक्यातील २७ वर्षीय तरुणीने तक्रार प्रविष्ट केली होती.

मनियार आणि कुंबलकर हे संगनमत करून तरुण-तरुणींना माहिती तंत्रज्ञान (आयटी) आस्थापनात नोकरीचे आमीष दाखवत. एका व्यक्तीकडून ते दोन ते अडीच लाख रुपये घेत. यांपैकी काही जणांना त्यांनी कुंबलकर यांच्या आस्थापनात नोकरी देत २ महिने वेतनही दिले. अशा प्रकारे या दोघांनी अनेकांची फसवणूक केली. तक्रारदार तरुण खराडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी तक्रार प्रविष्ट करण्यास नकार दिला. (अशा पोलिसांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक)

युवा सेनेचे ओंकार तुपे यांनी तरुणांसह पोलीस आयुक्तांची भेट घेऊन ही घटना सांगितली. त्या वेळी आयुक्तांनी खराडीचे पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना भ्रमणभाषवरून खडसावून तक्रार प्रविष्ट करण्यास सांगितले. यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. (राजकीय किंवा सामाजिक संघटना यांनी मध्यस्थी केल्यावर आणि पोलीस आयुक्तांनी खडसावल्यावरच गुन्हा नोंद होणे, हे पोलीस खात्याला लज्जास्पद ! अशा पोलिसांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! – संपादक)

संपादकीय भूमिका

फसवणूक करणार्‍यांवर केवळ गुन्हा नोंद करून न थांबता त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !