साधकांना आधार देणारे आणि उत्तम नेतृत्वगुण असलेले ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. नागेश गाडे (वय ५० वर्षे) !

‘१७.५.२०२६ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने झालेल्या ‘श्री राजमातंगी देवी महायज्ञा’च्या ठिकाणी ‘कार्यस्थळ निर्माण करण्याची’ सेवा होती. त्या वेळी साधकाच्या लक्षात आलेली श्री. नागेश गाडे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ५० वर्षे) यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कमळावर आरूढ असलेल्या श्री राजमातंगी देवीचे प्रचलित चित्र

१. साधकांना सेवा करतांना आधार देणे 

‘कार्यस्थळ निर्माण करणे’ या सेवेची व्याप्ती पुष्कळ मोठी होती. या सेवेतील साधकांना त्या क्षेत्रातील अनुभवही नव्हता. श्री. नागेश गाडे यांनी प्रत्येक समितीतील साधकांना त्यांच्या सेवेची व्याप्ती सविस्तरपणे समजावून सांगितली. त्यामुळे साधकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. ‘कंत्राटदाराशी कसे बोलायचे, कार्यक्रमस्थळी आपल्याला हव्या असलेल्या सुविधा नियोजित वेळेत कशा पूर्ण करून घ्यायच्या, सेवेतील बारकावे, कोणत्या कृती प्रथम आणि कोणत्या नंतर कराव्यात, पाठपुरावा कसा घ्यावा’, याविषयी नागेशदादांनी साधकांना बारकाव्यांनिशी समजावून सांगितले. साधकांना नागेशदादांचा आधार वाटत होता.

श्री. नागेश गाडे

२. नेतृत्वगुण 

२ अ. अडचणीवर अचूक उपाययोजना सांगणे : प्रशासनाच्या अनुमती वेळेत न मिळणे, मैदानातील बांधकाम निर्मितीत येणारे अडथळे, अशा अनेक अडचणी सेवा करतांना येत होत्या. प्रत्येक वेळी नागेशदादा शांतपणे प्रत्येक अडचणीवर अचूक उपाययोजना सांगत होते. ते सर्व प्रसंग स्थिर राहून हाताळत होते. त्यांच्या मनात कधीही उद्विग्नता दिसली नाही. ते खंबीर आणि स्थिर राहून कंत्राटदाराकडून समयमर्यादेत कामे करून घेत होते.

२ आ. सेवेचा सर्वांगांनी अभ्यास करणे : वीजजोडणीचे प्रमाणपत्र १५.५.२०२६ या दिवसापर्यंत मिळणे अपेक्षित होते; मात्र कंत्राटदाराचे म्हणणे होते की, ‘डी.जे.’ लागल्यानंतर प्रमाणपत्र घेतले तरी चालेल.’ तेव्हा नागेशदादांनी कंत्राटदाराला अधिकार्‍यांना भेटण्यास सांगितले, तसेच ‘इतर काही अनुमती घेणे आवश्यक आहे का ?’, याविषयी चौकशी करण्यास सांगितले. कंत्राटदाराने तशी चौकशी केली असता आणखी काही प्रमाणपत्रांचीही आवश्यकता असल्याचे लक्षात आले. परिणामी सर्व अनुमती मिळवण्याच्या सेवा समयमर्यादेत पूर्ण करता आल्या.

श्री. बळवंत पाठक

३. इतरांचा विचार करणे

नागेशदादांनी कंत्राटदाराच्या कामगाराला प्रतिदिन ताक देण्याची व्यवस्था केली होती, तसेच ज्या दिवशी त्यांच्यावर कामाचा अधिक भार असेल, त्या दिवशी त्यांना जेवणाचा डबा द्यायलाही सांगितले होते.

४. व्यष्टी साधनेचे गांभीर्य 

कार्यस्थळ निर्माण करण्याच्या सेवेत अनेक वेळा लहान लहान सेवा एकाच वेळी पूर्ण कराव्या लागत होत्या. तेव्हा व्यष्टी साधना करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसे. नागेशदादा महाप्रसाद घेण्यासाठी सेवाकेंद्रात आल्यावर प्रथम ध्यानमंदिरात जाऊन नामजपादी उपाय करत असत.’

– श्री. बळवंत पाठक (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४२ वर्षे), मुंबई (२०.५.२०२६)