शिक्षणाचा उद्देश : जीवनमूल्यांचे, म्हणजेच नीतीमूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यावर करणे आवश्यक !

मनुष्य हा प्रगत बुद्धी असलेला एकमेव प्राणी आहे. त्याच्या बुद्धीमत्तेचा आणि सामाजिकतेचा विकास व्हावा, म्हणून शिक्षणव्यवस्था राबवण्यात येते. शिक्षण कशासाठी, तर मानवी जीवन अधिकाधिक समृद्ध बनवण्यासाठी ! म्हणून त्याच्या व्यक्तीमत्त्वात ज्ञान जिज्ञासा, शौर्य, धैर्य, प्रामाणिकपणा, औदार्य, सर्व मानवांविषयी प्रेम, निष्ठा, आत्मनियंत्रण, त्याग करण्याची मानसिकता, विनम्रता, कृतज्ञता, क्षमाशीलता इत्यादी गुणांचा विकास होणे अपेक्षित आहे. आज शिक्षणाने आणि ज्ञानाने माणूस नम्र, सुरक्षित, समंजस, प्रेमळ अन् दयाळू होण्याऐवजी गर्विष्ठ, असुरक्षित, असमंजस, हेकेखोर, स्वार्थी अन् सत्तापिपासू होतांना दिसत आहे. आजच्या औपचारिक शिक्षणात जीवनमूल्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी नीतीमूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यावर करणे आवश्यक आहे.

शिक्षणासंबंधी जे. कृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे, ‘खर्‍या अर्थाने शिक्षण एखाद्या व्यक्तीस परिपक्व आणि मुक्त होण्यास अन् त्यांच्यामध्ये प्रेम, चांगुलपणा फुलवण्यास मोठ्या प्रमाणात साहाय्य करते. शिक्षणाचे सर्वांत मोठे कार्य, म्हणजे जीवनाचा संपूर्ण व्यवहार करण्यास अशी समग्रतेची भान असणारी व्यक्ती घडवणे होय.’ आजचे औपचारिक शिक्षण केवळ उपजीविकेचे साधन म्हणून मर्यादित आहे.

( साभार : ग्रंथ ‘समग्र व्यक्तीमत्व विकास’, सुविचार दैनंदिनी)