काश्मीरचे तुणतुणे !

संपादकीय

२५ डिसेंबरला भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून पाकच्या तीन सैनिकांना मारले. पाकच्या सैन्याने केलेल्या भारतीय सैन्याच्या हानीचा तो प्रतिशोध होता. भारतीय सैन्याचा तो पराक्रमच होता. त्यासाठी त्यांची वाहवा झाली आणि पाकनेही त्याची प्रतिक्रिया २८ डिसेंबरला दिली. तरीही आता पाक सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी पुढे येऊन काहीतरी बालीश आरोप केला आहे. म्हणे काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून पाकच्या ३ सैनिकांना ठार मारल्याचा केलेला दावा म्हणजे काश्मीर प्रश्‍नावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे.

पुढे जाऊन हे गफूर महाशय म्हणाले, गेल्या वर्षीही भारताने पाकवर सर्जिकल स्ट्राईक केल्याचा खोटा प्रचार केला होता. काश्मीर प्रश्‍नावरून लक्ष हटवण्यासाठीच भारताची ही चाल आहे. आम्ही कुठल्याही आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी सक्षम आहोत. कुलभूषण जाधव प्रकरणी आम्ही एक उत्तरदायी राष्ट्र म्हणून त्यांची त्यांच्या कुटुंबियांशी भेट घडवून आणली; मात्र भारतीय प्रसारमाध्यमांनी त्याचे नकारात्मक वार्तांकन केले. खोटारडेपणा करण्यात पाकचा हात धरणारा कोणी नाही, हेच खरे ! भारताशी संबंधित कोणत्याही गोष्टीच्या संदर्भात कांगावा करण्यात पाक पुढे असतो, हे जगाला ठाऊक आहे. नुकताच पाकच्या कारागृहात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी यांचा पाकदौरा समाप्त झाला. त्या दोघींना पाकमध्ये मिळालेली वागणूक अतिशय अपमानास्पद होती, म्हणून पाक चारी दिशांनी टीकेचे लक्ष्य बनला आहे. पाकने जी वागणूक त्या दोघींना दिली, ती गफूर यांना माणूसकीपूर्ण आणि उत्तरदायी देश म्हणून दिल्यासारखी समाधानकारक वाटते. भारतीय संसदेत पाकच्या नीतीचे वाभाडे निघाल्यावर भारतावर पलटवार करण्याच्या हेतूने त्यांनी आता खोटारडेपणा चालवला आहे. काश्मीर हे त्यांचे नेहमीचे तुणतुणे आहे. मागील ७० वर्षांपासून सारे जग ते ऐकत आहे. खोटारडेपणाची परिसीमा म्हणजे परवा २५ डिसेंबर या दिवशी भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेला पराक्रम आणि २९ सप्टेंबर २०१६ चे सर्जिकल स्ट्राईक या दोन्ही गोष्टी आता त्यांच्याकडून नाकारल्या जात आहेत. याहून दुसरा बालीशपणा दुसरा कोणता असू शकेल का ? पृथ्वीच्या पाठीवरील या दोन घटना शेकडो जणांनी अनुभवल्या असतांनाही हा देश ढळढळीत खोटे बोलून नाकारत आहे, तरीही त्याला जगात स्वतंत्र अस्तित्व आहे. जागतिक शांतता नष्ट करण्याची सुप्त शक्ती या देशात आहे, असे म्हणता येते.

कुलभूषण जाधव यांच्याशी त्यांची आई आणि पत्नी यांची आम्ही भेट घालून दिली; पण भारतीय प्रसारमाध्यमांनी त्याचे नकारात्मक वार्तांकन केले, असे मेजर जनरल गफूर म्हणत आहेत. पाकमध्ये जे घडले, त्याचे अचूक वार्तांकन केले गेले, तरी पाकच्या दृष्टीने ते चुकीचे ठरले.

पाकचा भारतद्वेष !

कुलभूषण जाधव यांच्या आईला मंगळसूत्र काढून ठेवायला सांगणे, त्यांच्या हातातील बांगड्या काढून ठेवायला भाग पाडणे, सौभाग्याचे प्रतिक म्हणजे कपाळावरील कुंकू नको म्हणून त्या हिंदु महिलेचा अपमान करणे, हे सर्व पाकच्या अधिकार्‍यांनी कशापायी केले ? हा त्यांच्यातील हिंदुद्वेषच होता ना ? हिंदु सुवासिनीचा हा अपमान ते कसा पचवणार ? या व्यतिरिक्त त्या दोघींना हिणवणारे प्रश्‍न विचारून त्यांना मानसिक त्रास दिला गेला, ते वेगळेच. खुनी मुलाची भेट घेतांना तुम्हाला कसे वाटते ?, असा प्रश्‍न एका पत्रकाराने केला. पाकच्या या नीतीची जगभर छी-थू झाली आणि त्यापासून लक्ष विचलीत करण्यासाठी आता तो काश्मीरचे सूत्र पुढे करत आहे. पाकसाठी काश्मीर ही सुरक्षेची ढाल आहे. पाकच्या निर्मितीपासूनच ते त्यांना लाभले असल्यामुळे आजही पाकला सुरक्षितता जाणवत आहे. याचे कारण असे की, काश्मीरची समस्या चर्चा किंवा वाटाघाटी यांच्या साहाय्याने सुटणे कधीच शक्य नाही, याची खात्री त्यांना आहे. त्यामुळेच तर भारतीय जनता भारतीय शासनाला परत परत सुचवत असते की, पाकवर आक्रमण करून निर्णायक लढाईपर्यंत आगेकूच करा. असे झाले तरच पाकचे नाव जगाच्या नकाशावरून पुसले जाईल किंवा पाकला काश्मीर ही सुरक्षेची ढाल पुढे करायला संधी रहाणार नाही. भारताबरोबरच्या समस्या पाक सामंजस्याच्या भावनेतून कधीही सोडवू शकत नाही, कारण सामंजस्य किंवा सुसंस्कृतपणा हे शब्द त्यांच्या शब्दकोशात नाहीत. भारतावर आक्रमण करणार्‍या मोगलांचा इतिहास मागे वळून पाहिला, तर हे चांगले लक्षात येते. कृतघ्नपणाची परिसीमा म्हणजे मोगल ! ११९१ मध्ये पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान यांनी महमद घोरीचा पराभव केला; पण त्याला सोडून दिले. ११९२ मध्ये घोरीने परत आक्रमण करून पृथ्वीराजांचा पराभव केला आणि त्यांना गझनीला नेऊन त्यांची हत्या केली. आजचा पाक याहून वेगळ्या मानसिकतेचा नाही. त्या वेळचे क्रौर्य आणि तीच नीती पाकच्या आचरणातून प्रदर्शित होत असते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांना का घुसावे लागले ? आणि २९ सप्टेंबरचा सर्जिकल स्ट्राईक का झाला ? पाकने प्रथम भारतीय सैनिकांची मानवी हानी केली, त्याचा वचपा काढण्यासाठीच भारतीय सैनिकांनी कृती केल्या. भारतीय सैन्याच्या अधिकारांचा तो भाग होता. पाक मात्र ते मान्य करत नाही. त्याला भारताकडून म्हणजे हिंदूंकडून पराभूत झालेले पचनी पडत नाही. भारताबरोबर तो नेहमी युद्धखोर भाषा करत असतो. आम्ही कुठल्याही आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी सक्षम आहोत, अशी चेतावणीपण तो देतो. ती कशासाठी ? भारत युद्ध लादेल, अशी भीती तर त्याच्या मनात नसेल ? त्याच्या मनातील हा संशय नष्ट करण्यासाठी आणि फाळणीपासूनच आपल्या मागे लागलेली उग्रतेची पीडा नष्ट करण्यासाठी पाकवर शौर्य गाजवणारे युद्ध लादणे, हाच एकमेव पर्याय होय !


Multi Language |Offline reading | PDF