भारताने प्रथमच क्षेपणास्त्रांवर १२ ‘सक्रीय’ अण्वस्त्रे केली तैनात ! – SIPRI Report

  • जागतिक स्तरावर शस्त्रास्त्रांवर लक्ष ठेवणार्‍या ‘सिप्री’ या स्विडिश संस्थेचा दावा

  • अनेक दशकांच्या भारताच्या अणवस्त्रांच्या धोरणात पालट

AI निर्मित चित्र

स्टॉकहोम (स्वीडन)/नवी देहली – जागतिक स्तरावर शस्त्रास्त्रांवर लक्ष ठेवणार्‍या स्विडनच्या ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’, म्हणजेच ‘सिप्री’ या संस्थेने भारताच्या संदर्भात मोठा दावा केला आहे. भारताने किमान १२ अण्वस्त्रे ‘सक्रीय’ स्थितीत तैनात केली आहेत, असे सिप्रीचे म्हणणे आहे. हा दावा भारताच्या दीर्घकाळापासून चालत आलेल्या अण्वस्त्रांच्या धोरणातील एक महत्त्वपूर्ण पालट दर्शवतो.

‘सिप्री’च्या दाव्याचा अर्थ असा की, ही अण्वस्त्रे भारतीय युद्धनौका, पाणबुड्या किंवा इतर वाहक यंत्रणा यांच्यावर सतत तैनात ठेवण्यात आली आहेत. थोडक्यात सांगायचे, तर एखाद्या देशाने भारतावर अण्वस्त्रांचा वापर करण्याचा प्रयत्न केलाच, तर भारत त्वरित अण्वस्त्रांद्वारेच प्रतिआक्रमण करण्यास सज्ज आहे.

‘सिप्री’च्या यापूर्वीच्या अहवालांमध्ये भारताच्या अण्वस्त्रांचे वर्णन ‘तैनात करून ठेवण्यात आलेले’, असे न करता ‘साठा’ (स्टॉकपाईल) म्हणून केले जात असे.

भारताचे अण्वस्त्रांना हाताळण्याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण पालट जाणून घ्या !

१. ‘सिप्री’च्या अहवालानुसार भारताकडे एकूण १९० अण्वस्त्रे आहेत.

२. शांततेच्या काळात भारत त्याची अण्वस्त्रे तैनात असलेल्या प्रक्षेपकांपासून वेगळी ठेवतो, असे दीर्घकाळापासून मानले जात होते. तथापि क्षेपणास्त्रे ‘कॅनिस्टर’मध्ये (संरक्षक आवरणात) ठेवणे आणि समुद्रात प्रतिबंधात्मक गस्त घालणे यांसारख्या अलीकडील हालचालींवरून असे दिसून येते की, भारत आता शांततेच्या काळातही काही अण्वस्त्रे प्रक्षेपकांशी जोडण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

३. ऑगस्ट २०२४ पासून भारताने अण्वस्त्रक्षमता असलेली २ क्षेपणास्त्रवाहू पाणबुड्या ‘आय.एन्.एस्. अरिघात’ आणि ‘आय.एन्.एस्. अरिदमन’ कार्यान्वित केल्या आहेत. या दोन्ही पाणबुड्या अण्वस्त्रसज्ज क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहेत.

४. पाककडे १७० अण्वस्त्रे आहेत; मात्र त्यांपैकी कोणतेही सध्या प्रत्यक्ष तैनात केलेले नाही.

५. भारत आता पाकच्या तुलनेत पुष्कळ वेगाने अण्वस्त्रांची निर्मिती करत आहे आणि या प्रयत्नांवर प्रचंड निधी खर्च केला जात आहे.

भारताने गेल्यावर्षी अण्वस्त्रनिर्मितीसाठी खर्च केले २७ सहस्र कोटी रुपये !

‘इंटरनॅशनल कॅम्पेन टू ॲबोलिश न्यूक्लियर वेपन्स’ संस्थेच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, वर्ष २०२५ मध्ये अण्वस्त्रांवरील जागतिक खर्च विक्रमी पातळीवर पोचला. भारतानेही अण्वस्त्रांवरील त्याचा खर्च वाढवला. तथापि एकूण खर्चाच्या संदर्भात भारत चीन आणि अमेरिका यांच्या तुलनेत पुष्कळ मागे आहे. वर्ष २०२५ मध्ये जगभरात अण्वस्त्रांवर एकूण ११९ अब्ज डॉलर्स खर्च करण्यात आले. या अहवालानुसार अमेरिकेने ६९.२ अब्ज डॉलर्स, चीनने १३.५ अब्ज डॉलर्स, तर भारताने २.८ अब्ज डॉलर्स (२६ सहस्र ७११ कोटी भारतीय रुपये) अण्वस्त्रांवर खर्च केले.