देशाची बौद्धिक हानी रोखण्यासाठी …

संपादकीय

‘ब्रेन ड्रेन’च्या समस्येने भारताला ग्रासलेले असतांना एक कौतुकास्पद आणि आदर्शवत घटना समोर आली आहे. बरनाना याडगिरी हा भाग्यनगरमधील एका मजुराचा मुलगा ! परिस्थिती हालाखीची असली, तरी याडगिरी यांनी परिस्थितीला दोष न देता अत्यंत मेहनतीने आणि चिकाटीने भारतीय तंत्रविज्ञान संस्थेसारख्या (IIT सारख्या) अग्रगण्य संस्थेत शिक्षण पूर्ण केले. त्यांना ‘युनियन पॅसिफिक रेल रोड’ या अमेरिकास्थित आस्थापनाकडून गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीची संधीही आली होती; मात्र देशसेवा करण्याच्या निश्‍चयातून त्यांनी ती संधी धुडकावली. याडगिरी यांचे कौतुक इथेच थांबत नाही; कारण त्यांनी केवळ विदेशात जाण्याचे नाकारले नाही, तर भारतातही ‘सॉफ्टवेअर’ आस्थापनात चाकरी न करता सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. ‘पैशांची मला कधीच अभिलाषा नव्हती. मी माझ्या अंतर्मनाची हाक ऐकायचे ठरवले. मातृभूमीच्या सेवेतून जे समाधान मिळते, ते पैशांमध्ये तोलले जाऊ शकत नाही’, अशी भावना त्यांनी  डेहराडून येथील प्रशिक्षणानंतर व्यक्त केली. जरी उच्चशिक्षण घेऊन परदेशात स्थायिक होणार्‍या भारतियांचे प्रमाण पुष्कळ असले, तरी याडगिरीसारख्या तरुणाची उदाहरणे समाजात एक आदर्श निर्माण करत आहेत, हे निश्‍चित !

परदेश ओढीची कारणे

मध्यंतरीच्या काळात उच्चशिक्षित तरुणांनी चाकरीसाठी परदेशाची वाट धरायची लाट आली. ती लाट अजूनही कायम आहे. भारताची बौद्धिक संपदा विदेशात आणि विदेशासाठी कार्यरत होणे, ही भारताची बौद्धिक हानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही त्यामुळे त्यांच्या विदेश दौर्‍यामध्ये परदेशस्थ नागरिकांना संबोधित करतांना त्यांना मातृभूमीकडे परत येण्याची साद घालतांना दिसतात. भारतीय बुद्धीवंतांनी विदेशाची वाट धरण्यामागे ‘भारतात गुणवत्तेला वाव नाही’, असे एक ठळक कारण सांगितले जाते आणि त्यात तथ्यही आहे. आरक्षणाच्या रोगामुळे म्हणा अथवा ढिसाळ व्यवस्थेमुळे म्हणा, गुणवंत विद्यार्थ्यांच्या पदरी बहुतांश वेळी उपेक्षाच येते, हे सत्य आहे. पात्रता असूनही डावलले जात असेल, तर विद्यार्थ्यांचा हिरमोड होणारच. त्यातूनच मग परदेशातील संधी आणि पैसे यांच्याकडे तरुण खेचले जातात. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी केवळ भावनिक आवाहन न करता आरक्षणव्यवस्था बंद करायला हवी. पदोन्नती देतांना खुशमस्करी आणि सेवाज्येष्ठता यांचा नाही, तर गुणवत्ता आणि कामगिरी यांचाच विचार करायला हवा. प्रत्येक व्यक्तीला कामाप्रमाणे मोबदला मिळेल, अशी व्यवस्था निर्माण करावी लागेल. गोंधळी लोकप्रतिनिधींना लक्षावधी रुपये आणि प्राणावर उदार होऊन देशरक्षण करणार्‍या सैनिकांना काही सहस्र रुपये, केवळ सरकारी नोकर आहे म्हणून गलेलठ्ठ वेतन आणि खासगी क्षेत्रात अधिक गुणवत्तापूर्ण काम करूनही कमी वेतन, असा विरोधाभास बंद करावा लागेल. आपल्याकडे पदानुसार वेतन दिले जाते. एखाद्या पदावरील व्यक्ती सक्षम नसतांनाही केवळ त्या पदावर आहे, म्हणून त्या पदाचे लाभ घेते. सारांश काय, तर ‘ब्रेन ड्रेन’चे खापर केवळ विद्यार्थ्यांवर फोडून चालणार नाही. असे असले, तरी देशाच्या मातीत रुजून फळे परदेशाला देण्याच्या वृत्तीचे आणि कृतीचे समर्थन होऊ शकत नाही. असे करणे म्हणणे घरात गरिबी आहे; म्हणून श्रीमंतांच्या घरी गुलाम म्हणून रहाण्यासारखे आहे. कुणीही स्वाभिमानी व्यक्ती घरात गरिबी असली, तर स्वतः श्रीमंत होण्याचा प्रयत्न करेल. ही सर्वसामान्य गोष्ट उच्चविद्याविभूषितांकडून कृतीत आणली जाऊ नये, हे खेदजनक आहे.

धर्मसेवा आणि देशसेवा सर्वोच्च !

कुटुंब, समाज आणि त्यानंतर राष्ट्र यांसाठी त्याग करण्याचे संस्कार पूर्वी गुरुकुल शिक्षणपद्धतीद्वारे मुलांवर केले जात होते. त्यामुळे ‘स्व’ला विसरून इतरांच्या भल्यासाठी जीवन व्यतित करण्याचा आदर्श विचार मुलांवर होत असे. आता तसे नाही. सुखासीन जीवन जगणे, बँक बॅलेन्स यांचा विचार आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात करतांना दिसते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पालकही मुलांच्या अशा मानसिकतेला खतपाणी घालतांना दिसतात. भारतात आधुनिक वैद्य, तंत्रज्ञ, अभियांत्रीक यांची कमतरता नाही; मात्र त्यांचा लाभ भारतातील पीडित घटकांना होत नाही. अशांना प्रशिक्षण देण्यासाठी सरकार प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते; मात्र त्यांच्या शिक्षणाचा लाभ हा विदेशी समाजाला होतो, हेच विदारक सत्य आहे. ‘भारत पुन्हा महासत्ता बनावा’, असे स्वप्न राष्ट्रप्रेमी उरी बाळगून आहेत. हे स्वप्न साकारायचे असल्यास ‘ब्रेन ड्रेन’ची समस्या लवकरात लवकर सुटायला हवी. ही समस्या सोडवण्याचे दायित्व केवळ सरकारचे नाही, तर समाज आणि कुटुंबीय यांचेही आहे.

कुणाही व्यक्तीचे पैसा आणि सेवा यांपैकी प्रथम प्राधान्य धर्मसेवा आणि देशसेवा यांनाच असायला हवे. स्वातंत्र्यपूर्व काळात आरामात जीवन व्यतित करण्याची संधी असूनही अनेक क्रांतीविरांनीही सरकारी नोकरीला लाथ मारून देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी संपूर्ण जीवन समर्पित केले. बॅरिस्टर स्वातंत्र्यवीर सावरकर हे अशा भारतरत्नांच्या सूचीतील एक महत्त्वाचे नाव ! भारतियांच्या रक्तातच देशभक्ती आणि धर्मसेवा यांची बिजे आहेत; मात्र त्यावर पाश्‍चात्त्य संस्कृती, चंगळवाद, अयोग्य दृष्टीकोन, स्वार्थ यांचे आवरण आल्याने देशाची हानी होत आहे. असे असले, तरी धर्मसेवेसाठी संन्यास घेणारे जैन राठोड दांपत्य, बरनाना याडगिरी यांच्यासारख्या युवकांची, तसेच धर्म आणि राष्ट्र यांच्या सेवेसाठी संपूर्ण जीवन समर्पित केलेल्यांची समाजात पुष्कळ उदाहरणे आहेत. धर्मसेवा आणि देशसेवा हीच सर्वोच्च असल्याने त्याला प्राधान्य देणारे युवक हेच भारताचे आशास्थान आहे आणि त्यामध्येच भविष्यातील सर्वकल्याणकारी हिंदु राष्ट्राचे बीज दडलेले आहे !


Multi Language |Offline reading | PDF