(म्हणे) ‘अशी गुरुदक्षिणा द्यायला या बाबाने सरकारला कोणते योगासन शिकवले ?’

शासनाने पतंजलिच्या ‘फूड पार्क’ला अल्प दराने भूमी दिल्याचे प्रकरण

आमदार संजय दत्त यांच्याकडून योगऋषी रामदेवबाबा यांच्याविषयी अवमानकारक उल्लेख

हिंदुद्रोही काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींकडून  संतांचा आदर राखण्याची अपेक्षा करणे व्यर्थ !

आमदार संजय दत्त, कॉंग्रेस

नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) – जनतेच्या घामाच्या पैशाची भूमी शासनाने रामदेवबाबाला कवडीमोल किमतीमध्ये दिली आहे. अशी गुरुदक्षिणा द्यायला, या बाबाने सरकारला कोणते योगासन शिकवले, अशा प्रकारे काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी योगऋषी रामदेवबाबा यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केले. येथील मिहान येथील प्रतिहेक्टर १ कोटी रुपये किमतीची २३० हेक्टर भूमी योगऋषी रामदेवबाबा यांना फूड पार्कसाठी प्रतिहेक्टरी २५ लाख ५० सहस्र रुपयांना देऊन शासनाची आर्थिक हानी केल्याचा आरोप करत आमदार संजय दत्त यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडली. या वेळी त्यांनी योगऋषी रामदेवबाबा यांचा एकेरी उल्लेख केला.

या वेळी संजय दत्त म्हणाले,

१. पतंजलि योग समितीचे बाळकृष्ण यांचा देशातील श्रीमंतांमध्ये ८ वा क्रमांक लागत आहे. यातून हे शासन गोरगरिबांचे नव्हे, तर श्रीमंतांचे शासन आहे.

२. सामाजिक कार्यासाठी, मागासवर्गीय किंवा लघुउद्योग यांना अल्प दरात भूमी दिली जाते; मात्र पतंजलिला भूमी देतांना शासनाने यातील कोणत्या निकषावर भूमी दिली, हे स्पष्ट करावे.

याविषयी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधी राखून ठेवण्याची मागणी केली. काँगेसचे आमदार शरद रणपिसे यांनी या प्रकल्पासाठी जोडरस्ता आणि शासनाने दिलेली सवलत यांमध्ये शासनाची २०८ कोटी रुपयांची हानी झाल्याचा आरोप केला. यावर राज्यमंत्री मदन येरावार यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. हा विषय ऐकून सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हा विषय लक्षवेधी राखून ठेवण्यास नकार देऊन आक्षेप घेणार्‍या लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाचा दौरा करून प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्याचे आवाहन केले.

आमदार संजय दत्त यांना संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांच्याकडून समज !

योगऋषी रामदेवबाबा हे जगाला योग शिकवत आहेत. त्यांचा अरे-तुरे असा एकेरी उल्लेख करणे लोकप्रतिनिधींना शोभनीय नाही, अशी जाणीव संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी आमदार संजय दत्त यांना करून दिली.

‘फूड पार्क’साठी खरेदी केलेल्या भूमीचा व्यवहार पारदर्शक ! – राज्यमंत्री मदन येरावार

पतंजलि योग समितीने घेतलेला भूखंड हा ‘फूड पार्क’साठी राखीव होता. या भूखंडाच्या विक्रीसाठी ग्लोबल टेंडर काढण्यात आले होते. यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पतंजलि योग समितीने पूर्ण केल्या आहेत. या भूखंडाच्या विक्रीचा व्यवहार अत्यंत पारदर्शक आहे. या जागेच्या विक्रीविषयी राष्ट्रीय वृत्तपत्रांत विज्ञापन देण्यात आले असून ही जागा ‘डेडलॉक’ झाली होती. या प्रक्रियेतील निविदा, करारपत्रे आदी सर्व कागदपत्रे मी पटलावर ठेवली आहेत, असा खुलासा राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधानपरिषदेच्या सभागृहात केला.


Multi Language |Offline reading | PDF