भारतातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक !

जगात ख्रिस्त्यांची १५७, मुसलमानांची ५२, बौद्धांची १२, तर ज्यूंचे १ राष्ट्र आहे. हिंदूंचे राष्ट्र या सूर्यमंडळात कुठे आहे ? होय, हिंदूंचे एक सनातन राष्ट्र १९४७ पर्यंत या पृथ्वीवर होते. काय आहे या राष्ट्राची आजची स्थिती ?

तेव्हाचा भारत आणि आजचा भारत !

वर्ष १९४७ मध्ये १ रुपयाचेही कर्ज नसलेल्या भारतात आज प्रत्येक नागरिक ३२,८१२ रुपयांच्या कर्जाचा भार डोक्यावर वहातो आहे. वर्ष १९४७ मध्ये ३३ टक्क्यांहून अधिक निर्यात करणारा भारत आज १ टक्क्याहून कमी निर्यात करतो आहे. जेमतेम १० ते २० परदेशी कंपन्या असणारा भारत आज ५,००० हून अधिक परदेशी कंपन्या उरावर वागवत आहे. एकही संवेदनशील जिल्हा नसलेल्या भारतात आज ३०० हून अधिक जिल्हे संवेदनशील झाले आहेत. प्रत्येक नागरिकामागे एक-दोन गायी असे प्रमाण असणारा भारत अनिर्बंध गोहत्येपायी आज १२ व्यक्तींमागे एक गाय बाळगतो आहे. परदेशात जाऊन अत्याचारी कर्झन वायली, ओडवायर अशांना ख्रिस्तसदनी पाठवणार्‍या भारताने आज संसदेवर आक्रमण करणार्‍या अफझलला फाशी द्यायला १३ वर्षे घेतली !

देशाभिमान जागृत असलेला भारत ते देशाभिमान गहाण टाकलेला भारत, भ्रष्टाचार निचांकावर असलेला भारत ते भ्रष्टाचाराच्या उच्चांकापर्यंत पोहोचलेला भारत, अटकेपार झेंडा रोवणारा भारत ते ‘काश्मीर हातातून आज जातोय कि उद्या’, याची वाट पहाणारा भारत… ही सूची लिहितांनाही मन आक्रंदत आहे; पण ‘जनाची सोडाच, मनाचीही लाज’ न बाळगणारे राज्यकर्ते मात्र वर तोंड करून सर्वत्र मिरवत आहेत. मुसलमान आक्रमक आणि धूर्त ब्रिटीश यांनीही भारतीय जनतेला जेवढे नागवले नाही, त्याच्या शतपटीने लोकशाहीने दिलेल्या शासनकर्त्यांनी अवघ्या ६ दशकांत येथील जनतेला नागवले, हे ठळक सत्य आहे.

‘लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेले लोकांचे शासन’, ही लोकशाहीची व्याख्या भारतासारख्या जगातील सर्वांत मोठ्या देशासाठी मात्र ‘स्वार्थांधांनी स्वार्थासाठी निवडून दिलेले स्वार्थी शासनकर्त्यांचे शासन’, अशी झाली आहे. काहींच्या मनात शंका उत्पन्न होईल की, ‘हिंदु राष्ट्रा’त तरी समस्या कशा काय सुटतील ? असे इतिहासात तरी कधी घडले आहे का ? अशांनी हे समजून घ्यावे की – होय, इतिहासात असे घडले आहे ! छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदु राष्ट्र (हिंदवी स्वराज्य)’ स्थापन होताच त्या वेळच्या अशाच समस्या दूर झाल्या होत्या !

छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदु राष्ट्र’स्थापन होताच सर्व ठीकठाक !

आजच्यासारखेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वीही हिंदु स्त्रियांचे शील सुरक्षित नव्हते, प्रत्यक्ष जिजामातेच्या जाऊबाईंनाच पाणवठ्यावरून यवन सरदाराने पळवून नेले होते. त्या काळी मंदिरे भ्रष्ट केली जात होती आणि गोमातेच्या मानेवर कसायाचा सुरा कधी फिरेल, हे सांगता येत नसे. महाराजांचे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होताच मंदिरे पाडणे थांबले एवढेच नव्हे, तर मंदिरे पाडून उभ्या केलेल्या मशिदींचे पूर्ववत् मंदिरांत रूपांतर झाले. डोळ्यांतून मूकपणे आसवें गाळणार्‍या गोमाता आनंदाने हंबरू लागल्या. ‘गोहत्या बंद करा !’, अशा मागणीसाठी शासनाकडे लाखो स्वाक्षर्‍या गेल्या नाहीत कि महाराजांनींही एखादे ‘गोहत्या प्रतिबंधक विधेयक’ मंत्रीमंडळात मांडले नाही. केवळ ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना हिंदुद्वेष्ट्यांच्या उरात धडकी भरवायला पुरेशी ठरली ! आज आपल्याला महागाई दिसते. ‘महाराजांच्या सत्ताकाळात महागाईने प्रजा भरडून निघाली होती’, असे कधी वाचले आहे का ? ‘जय जवान, जय किसान’ची घोषणा करणारे शासनकर्ते आज जवान आणि किसान या दोघांनाही कुत्र्याच्या मोलाने मरू देत आहेत. महाराजांना तर शेतकर्‍यांचे प्राणच नव्हेत, तर त्यांनी कष्टाने पिकवलेला भाजीपालाही मोलाचा वाटत होता. ‘शेतकर्‍यांच्या भाजीच्या देठालाही कोणी हात लावू नये’, अशी आज्ञाच त्यांनी केली होती. महाराजांनी ‘किसानां’च्या बरोबरीने ‘जवानां’चीही काळजी घेतली होती. लढाईत घायाळ झालेल्या अनेक सैनिकांना पुरस्कारासह सोन्याचा अलंकारही देऊन ते सन्मानित करीत. कारगील लढाईत धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या विधवांसाठी वर्ष २०१० मध्ये ‘आदर्श’ सोसायटी बांधली गेली; पण तिच्यात एकाही सैनिकाच्या विधवेला सदनिका (फ्लॅट) मिळाली नाही. भ्रष्टासुरांनीच त्या सर्व सदनिका लाटल्या ! याउलट महाराजांनी तर सिंहगडच्या लढाईत कामी आलेल्या तानाजीच्या पुत्राचा विवाह लावून देऊन त्याच्या कुटुंबियांची काळजी घेतली !

भारतासमोरील बाह्य समस्याही ‘हिंदु राष्ट्रा’त सुटतील !

‘हिंदु राष्ट्रा’त अंतर्गत समस्या सुटतील, तशाच बाह्य समस्याही सुटतील. बाह्य समस्यांमध्ये पाकिस्तान आणि चीन यांचे भारतावर केव्हाही होऊ शकणारे आक्रमण, ही मुख्य समस्या आहे. शिवकाळातही अशीच स्थिती होती. औरंगजेब ‘सिवा’चे टीचभर राज्य बुडवण्यासाठी टपून बसला होता; मात्र ‘महाराजांना राज्याभिषेक होऊन ‘हिंदु राष्ट्रा’ची विधीवत् स्थापना झाली’, हे ऐकूनच तो हादरला ! त्यानंतर पुढे महाराज स्वर्गारोहण करीपर्यंत तो केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर दक्षिणेतही उतरला नाही ! एकदाका ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना झाली की, आपले सर्व शेजारी सुतासारखे सरळ होतील !

‘हिंदु राष्ट्रा’त मुसलमानांचे काय करणार ?

‘हिंदु राष्ट्रा’चा विषय निघाला की, एक फाजील प्रश्‍न तथाकथित निधर्मीवाद्यांकडून विचारला जातो, तो म्हणजे ‘हिंदु राष्ट्रा’त मुसलमानांचे काय करणार ?’ खरे म्हणजे हा प्रश्‍न मुसलमानांना पडायला हवा. त्यांना तो पडत नाही. ते ‘हसके लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान !’ असेच म्हणत रहातात. अर्थात् या प्रश्‍नालाही उत्तर आहे. आगामी ‘हिंदु राष्ट्रा’त मुसलमानांनाच नव्हे, तर सर्वच पंथियांना शिवशाहीत दिली गेली, तशीच वागणूक मिळेल !

थोडक्यात, सूर्य उगवण्यापूर्वी सर्वत्र काळोख दाटून राहिलेला असतो, भूमीवर विसर्जित केलेल्या मल-मूत्राचा दुर्गंध येत असतो; परंतु सूर्य उगवताच काळोख आपोआपच नष्ट होतो, सर्व दुर्गंध वातावरणात विरून जातो. काळोखाला किंवा दुर्गंधाला कोणी सांगत नाही की, ‘दूर जा, सूर्य उगवतो आहे !’ आपोआपच हे सारे घडते. त्याचप्रमाणे आज भारतात पसरलेला विविध समस्यांरूपी काळोख आणि दुर्गंध ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होताच नष्ट होईल. धर्माचरणी राज्यकर्त्यांमुळे भारतापुढील सर्व समस्या सुटतील आणि सदाचरणामुळे सर्व जनताही सुखी होईल !

एकट्यादुकट्या समस्येच्या विरोधात लढण्यापेक्षा ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करणे आवश्यक !

केवळ भारतातीलच लोकांसाठी नव्हे, तर अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी स्थापन करावयाचे ‘हिंदु राष्ट्र’ मात्र आपोआप स्थापन होणार नाही. पांडवांना केवळ पाच गावे हवी होती, तीही त्यांना सहजासहजी मिळू शकली नाहीत. आपल्याला तर काश्मीर ते कन्याकुमारी असे अखंड ‘हिंदु राष्ट्र’ हवे आहे. यासाठी अनेक प्रयत्न करावे लागणार आहेत. भारतासमोरील एकट्यादुकट्या समस्येच्या (उदा. गोहत्या, धर्मांतर, गंगेचे प्रदूषण, काश्मीर, राममंदिर, स्वभाषारक्षण) विरोधात स्वतंत्रपणे लढण्यापेक्षा सर्व समविचारी व्यक्ती आणि संस्था यांनी मिळून ‘हिंदु राष्ट्र स्थापना’ हेच ध्येय बाळगून कृती केली, तर हा लढा थोडा सुकर होईल. स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, प.पू. गोळवलकर गुरुजी अशा हिंदु धर्मातील थोर-थोर पुरुषांनी चिंतिलेले असे धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होण्यासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक सामर्थ्य हिंदुत्वनिष्ठांना मिळो, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !